वाशीम : इंस्टाग्रामवर जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवल्याने शिरपूर येथे दोन गटात वाद झाला. या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर, रिसोड आणि मालेगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. दोनच दिवसांपूर्वी मंगरूळपीर येथे औरंगजेबाचे पोस्टर झळकल्याने तणाव निर्माण झाला होता. अशात हा प्रकार घडल्याने मंगळवार, १७ जानेवारी २०२३ रोजी सकल हिंदू समाजाच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले की, पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगेश इंगोले नावाच्या युवकाला अटक केली आहे. मुस्लिम व्यक्तीच्या नावाने त्याने ‘फेक आयडी’ तयार केल्याचे तपासात उघडकीस आले. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे इंस्टाग्रामवर जातीय तेढ निर्माण करणारे वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानंता शिरपूर येथे दोन गटामध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत दुकानांची व वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर शिरपूर शहर पूर्णपणे बंद ठेवत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. मंगळवारी याच प्रकाराच्या निषेधार्थ रिसोड आणि मालेगाव येथेही बंद पाळण्यात आला. वाशीम येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने बंद पाळत मोर्चा काढण्यात आला. संत सावता माळी चौक येथुन शहर पोलिस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या काही दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगरूळपीर येथेही औरंगजेबाचे पोस्टर झळकल्यानंतर तणाव वाढला होता. पोलिसांनी सुरुवातीला एकाला अटक केली. आता अटक करण्यात आलेल्यांची संख्या आठ झाली आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा ईशारा पोलिस अधीक्षक सिंह यांनी आधीच दिला आहे.