अकोला : वैशाख (बुद्ध) पौर्णिमेच्या तेजस्वी चांदण्यात अकोला वन्यजीव विभागाअंतर्गत शुक्रवार, ५ मे रोजी काटेपूर्णा अभयारण्यात निसर्ग अनुभव उपक्रम (पशुगणना) पार पडला. निसर्गप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी एकूण ३०९ वन्यजीव तथा पक्षी पाहिले, असे वनविभागाने म्हटले आहे.
निसर्गप्रेमींना बुद्ध पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी देण्यासाठी वनविभागाने ५ मे रोजी काटेपूर्णा येथे प्राणीगणनेचे आयोजन केले होते. पाणवठ्यांशेजारी सात मचान उभारण्यात आले होते. वन कर्मचाऱ्यांसह प्रत्येकी एक निसर्गप्रेमी नियुक्त करण्यात आला होता. त्यांनी मचानावरुन पौर्णिमेच्या रात्रीतून वन्यप्राणी प्रगणना आणि त्यांच्या हालचालीची निरीक्षणे नोंदविली.
ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केले होते त्यांना शुक्रवारी सकाळी अभयारण्यात प्रवेश देण्यात आला. संध्याकाळी मचानवर त्यांची व्यवस्था करण्यात आली. पाणवठ्यावर दिसणार्या प्राण्यांचे निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण करण्यात निसर्गप्रेमींनी रात्र काढली. विभागीय वन अधिकारी अनिल निमजे आणि सहायक वनसंरक्षक वसंत साबळे यांच्या देखरेखीखाली असलेल्या या उपक्रमाला वन परिक्षेत्र अधिकारी पवन जाधव आणि त्यांच्या टीमने सहकार्य केले.