Home » अमरावती, नागपूर विभागात ६० टक्केच्या आसपास मतदान

अमरावती, नागपूर विभागात ६० टक्केच्या आसपास मतदान

by नवस्वराज
0 comment

अकोला : अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघ आणि नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघासाठी सोमवार, ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही विभागात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

नागपूर विभागात विद्यमान आमदार नागो गाणार सलग तिसऱ्यांदा आपले भाग्य आजमावित आहेत. तर अमरावती विभागातही विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील यांनी पुन्हा मतदारांना कौल मागितला आहे. संपूर्ण विदर्भात निवडणुकीचे वातावरण असल्याने सोमवारी अनेक शाळा, महाविद्यालयांना प्रशासनाने सुटी जाहीर केली होती. मतदान केंद्र आणि संपूर्ण विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

डॉ. रणजित पाटील यांच्यासह २३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतपेटीत बंद झाला. येथे तिरंगी लढत असली तर अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने त्याचा फायदा डॉ. पाटील यांनाच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर विभागातही काँग्रेसमध्ये फूट पडल्याने त्याचा फायदा विद्यमान आमदार नागो गाणार यांनाच होईल असे राजकीय विश्लेषकांकडुन सांगण्यात येत आहे. अमरावती विभागातील मतदार संघांपैकी अकोला आणि अमरावतीमध्ये सकाळपासूनच संथ पद्धतीने मतदान सुरू होते. डॉ. रणजित पाटील मतदानानंतर ‘रिलॅक्स मूड’मध्ये दिसून आलेत.

चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील मतदारांमध्ये शिक्षक आमदाराच्या निवडणुकीसाठी उत्साह बऱ्यापैकी दिसून आला. दिवसभर मतदान केंद्रांबाहेर शिक्षक मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. मात्र सायंकाळच्या सुमारास काही शिक्षक विलंबाने पोहोचल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदानादरम्यान विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यात अनुचित प्रकार घडला नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अमरावती येथे मात्र आमदार रवी राणा यांच्यामुळे भाजप उमेदवार डॉ. पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!