Home » Upper Wardha Project : उपोषण मंडपातच शेतकऱ्याची आत्महत्या

Upper Wardha Project : उपोषण मंडपातच शेतकऱ्याची आत्महत्या

Protest Of Farmer : सरकारच्या नावे चिठ्ठी लिहित घेतला गळफास

by नवस्वराज
0 comment

Morshi : अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या आंदोलनात मोर्शी येथे एकाने उपोषण मंडपातच गळफास घेत आत्महत्या केली. सरकारविरोधात या शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. टाकरखेड येथील शेतकरी गोपाल दहीवडे यांनी उपोषण मंडपात कोणीही नसताना गळफास घेतला.

आपल्या आत्महत्येला शासन, प्रशासन जबाबदार असल्याचे दहीवडे यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहेत. चिठ्ठीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाचा उल्लेख आहे. ‘माझ्या मरणाला शासन, प्रशासन जबाबदार आहे. परंतु उमेशभाऊ चळवळ बंद करायची नाही. उमेशभाऊ माझे प्रेत न्याय मिळेपर्यंत माझ्या घरी नेवू देऊ नये’, असे दहीवडे यांनी गळफास घेण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांची शासनाकडून पूर्तता न झाल्याने गेल्या 252 दिवसांपासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन आता चिघळण्याची चिन्हे आहेत.

शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर संताप व्यक्त केला आहे. सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कोण सरकार चालवत आहे हे कळायला मार्ग नाही. राज्य सांभळणे होत नसेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका अॅड. ठाकूर यांनी केली.

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी मुंबईच्या मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या होत्या. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन हा तिढा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी न लागल्याने त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रात्रभर शिदोरी आणि शेकोट्यांसह ठिय्या दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्त पुन्हा मुंबईकडे निघाले होते. त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ रोखले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!