अकोला : प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, सदैव मदतीचा हात देणारे व सामान्यांमध्ये ‘लालाजी’ नावाने प्रसिद्ध असलेले अकोला पश्चिमचे भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचं शुक्रवारी निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते.
पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढविण्या त्यांचा मोठा वाटा होता. लोकनेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतराव देशमुख, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणुन आमदार शर्मा यांची ओळख होती. अत्यंत धार्मिक वृत्तीचे आमदार म्हणुन सर्वांना परिचित असणारे ‘लालाजी’ यांचं वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल न वापरणारा नेता असं अकोल्यात होतं. मोबाईल किंवा डायरी सोबत नसतानाही अनेकांचे संपर्क क्रमांक आमदार शर्मा यांना तोंडपाठ होते. श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग होता. १९८५ मध्ये झालेल्या शीलापूजनातही त्यांचा समावेश होता.
शनिवारी (ता. ४) त्यांच्या डाबकी मार्गावरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रे मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. अंत्ययात्रा आमदार शर्मा यांच्या निवासस्थानापासून बस स्थानक, गांधी रोड, सिटी कोतवालीमार्गे जुने शहरातील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ जाईल.आमदार शर्मा यांच्या पश्चात पत्नी गंगादेवी शर्मा, दोन मुलं, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.
अकोल्यातील श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं सामाजिक कार्यात सहभाग घेतला. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणुनही त्यांनी काम केलं होतं. रामदेव बाबा, शामबाबा मंदिर, सालासर हनुमान मंदिराचे विश्वस्त म्हणुन तसेच विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्व सेवाधीकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. पश्चिम विदर्भातील सर्वशाखीय ब्राह्मण समाजाला त्यांनी एकत्रित करण्याचं कामही केलं. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे अमूल्य योगदान होतं.
भाजपसाठी अकोला मतदारसंघ कायम अनुकूल मानला जातो. याच मतदारसंघात गोवर्धन शर्मा यांनी मागील २८ वर्षांत भारतीय जनता पार्टीचा दबदबा निर्माण केला होता. शर्मा यांनी २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नसतानाही मोठ्या मताधिक्यासह विजय खेचून आणला. अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपची तटबंदी फार मजबूत असल्याचं त्यांच्यामुळं कायम पाहायला मिळालं. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत आमदार गोवर्धन शर्मा यांना ६६ हजार ९३४ मतं मिळाली होती. २०१९ मध्ये शर्मा यांनी ७० हजार २९१ मतं प्राप्त केली.