अकोला : दिव्यांग सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून दिव्यांगांना सक्षम बनविणाऱ्या संस्थांना दरवर्षी विशेष पुरस्कार दिला जातो. २०२१-२२ या वर्षासाठी हा पुरस्कार अकोला जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे.
दिल्लीत येत्या ३ डिसेंबर या जागतिक अपंग दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची नोंद व त्याची सर्व माहिती संकलन करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात दिव्यांग सर्वेक्षण जानेवारी २०२१ पासून राबविण्यात आले. यासाठी ‘दिव्यांग सर्व्हे अकोला’ हे ऑनलाइन ॲप तयार करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान प्राप्त होणारा डेटा हा एकत्रित स्वरूपात तयार करून दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ या माध्यमातून अपंगांना मिळणार आहे. अकोल्यात वर्षभरात ४५ हजार ६०९ दिव्यांगांचे सर्वेक्षण जिल्ह्यात झाले आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, प्रभारी समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांनी आशा वर्कर, महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद यांसारख्या घटकांच्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण केले.