Akola : अकोला अर्बन बँकेच्या प्रगतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध असलेली बँक म्हणून नावाजलेली अकोला अर्बन बँकेला अधिक उत्तम व तत्पर सेवा देता यावी या उद्देशाने भारतीय रिझर्व बँकेने अकोला अर्बन बँकेच्या ब्राह्मण सभा विस्तार कक्षाला शाखेचा परवाना दिला आहे.
ब्राह्मण सभा विस्तार कक्षाचे शाखेत रूपांतर झाल्यामुळे स्थानांतरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जठारपेठ मधील विठ्ठल हाॅस्पिटल समोर नवीन शाखा स्थानांतरीत करण्यात आली आहे. स्थानांतरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी डॉ. सुशील फुंडकर यांच्या हस्ते नवीन शाखेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, संचालक मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुखेन शहा, विनोद अग्रवाल, नागोराव माहोरे यांच्यासह शाखेचे शाखाधिकारी किशोर फुलकर, कर्मचारी वृंद, ग्राहक तसेच भागधारक उपस्थित होते.