Akola | अकोला : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी रात्री अकोला शहरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. (Akola Untimely Heavy Rain Alongwith Thunderstorm And Lightning Strikes) जोरदार पावसामुळे सांडपाण्याच्या नाल्या भरल्यामुळे शहरातील सखोल भागात तसेच रस्त्यालगतच्या काही दुकानात पाणी शिरले. जुने शहरातील रस्त्यावर झाडाच्या फांद्या पडल्या. सोमवार सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. जुने शहराच्या अगरवेस, गुलजारपुरा, काळा मारोती, विठ्ठल मंदिर, जयहिंद चौक भाग रात्रभर अंधारात होता. सोमवारी सकाळी वीज पुरवठा सुरू झाला परंतु विजेचा लपंडाव मात्र सुरूच होता. अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यामुळे अधिक वाढल्या आहेत. वातावरणातील एकदम झालेल्या बदलाचा वृद्ध व लहान मुलांना त्रास होत आहे.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 52 मंडळांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षण करून तातडीने मदत देण्याची मागणी अकोला पश्चिमचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.