अकोला : अकोला व वाशिम जिल्ह्यातील ६०६ अवसायनात सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार असून त्याबाबत दि. २३ ऑक्टोबरपूर्वी सहायक निबंधक सहकारी संस्था (पदुम) यांच्याकडे आक्षेप दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यात २८३ दुध उत्पादक सहकारी संस्था, १६ कुक्कुटपालन सहकारी संस्था व १६ शेळी-मेंढी पालन सहकारी संस्था अशा एकूण ३१५ सहकारी संस्था अवसायनात आहेत. वाशिम जिल्ह्यात २१५ दुध उत्पादक सहकारी संस्था, १४ कुक्कुटपालन सहकारी संस्था व ६२ शेळी-मेंढी पालन सहकारी संस्था अशा एकूण २९१ सहकारी संस्था अवसायनात आहेत.
या संस्थांचे कामकाज बंद असणे, उद्देशानुसार कामकाज नसणे या कारणांमुळे अवसायनात काढण्यात आल्या. त्यात २३८ संस्थांना अवसायनात होऊन ६ वर्षांहून अधिक कालावधी झाला. संस्थांच्या मालमत्तेचे, दप्तराचे, संस्थेचे देणे-घेणे आदीबाबतीत कार्यवाही करण्यासाठी अवसायकांना संस्थेचे दप्तर प्राप्त न होणे, नोंदणी पत्त्यावर कार्यस्थळी संस्थेचा ठावठिकाणा न मिळणे, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, समिती सदस्य, व्यवस्थापक यांचा ठावठिकाणा न मिळणे आदी बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे या संस्थांच्या नोंदणी रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. अशा संस्थांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
संबंधितांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात सहायक निबंधक सहकारी संस्था (पदुम) अकोला यांचे कार्यालय, द्वारा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, शासकिय दुध योजनेच्या बाजूला, मूर्तिजापूर रोड, अकोला यांच्या कार्यालयात २३ ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावेत अन्यथा संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक निबंधकांनी दिला आहे.