Akola | अकोला : शासनाने कागदोपत्री बंदी घातलेल्या घातक चायना मांजाची खुलेआम विक्री सुरू आहे. नायलॉन मांजामुळे राज्यात मागील महिन्यापासून आता पर्यंत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेत महानगरातील तीन दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेत. दोघे जेल चौकाजवळील उड्डाणपुलावर तर एकाला अकोला-कापशी मार्गावर दुखापत झाली. एकाच्या मानेला 14 तर दुसऱ्याला 6 टाके लागले, तिसऱ्याच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. (Akola Three Citizens Seriously Injured Due To China Manja)
0.01 मिलीमीटरचा साधा दोरा तुटण्यासाठी 1 किलो 300 ग्राम, 0.023 मिलीमीटरचा साधा मांजाला 2 किलो 700 ग्राम तर 0.025 मिलीमीटरचा चायना नायलाॅन मांजासाठी 3 किलोहून अधिक वजनाची शक्ती लागते. साधा तसेच नायलाॅन मांजा मासात लगेच आत जाऊन मांस कापतो. यावरून लक्षात येते की नायलाॅन मांजा किती घातक आहे. दरवर्षी चायना नायलाॅन मांजामुळे अनेकजणांना गंभीर दुखापत होते काहीजण मृत्यूमुखी पडतात. अकोला महानगरात चायना नायलाॅन मांजाची खुलेआम विक्री सुरू असताना प्रशासनातर्फे कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. नागरीकांना गंभीर दुखापत होऊनही प्रशासना तर्फे याकडे डोळेझाक करण्यात येत असल्यामुळे काही अर्थपूर्ण कारण असल्याची चर्चा आहे.