अकोला : दोन वेगवेगळ्या धर्मातील असलेल्या मुलामुलीचा विवाह तिसऱ्याच धर्मपद्धतीनुसार लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. अल्पवयीन असलेल्या मुलीच्या विवाहप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. अकोल्यातील बार्शीटाकळी पोलिस ठाण्याअंतर्गत हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १७ वर्षीय मुलीशी युवक विवाह करणार होता. मुलीला पळवून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात केली होती. युवती सज्ञान असल्याचा दावा युवकाशी संबंधित काही जणांनी केला आहे. तर युवतीच्या आईने प्रमाणपत्र सादर करीत युवती अल्पवयीन असल्याचे नमूद केल्याने युवतीच्या जन्माचे खरे प्रमाणपत्र कोणते असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलगा व मुलगी दोन वेगवेगळ्या धर्माचे आहेत. अशात त्यांचा तिसऱ्या धर्मानुसार विवाह लावण्याची गरज काय होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोल्याच्या शेजारी असलेल्या अमरावती जिल्ह्यात सध्या दोन वेगवेगळ्या धर्मातील युवक-युवतीचे विवाह प्रकरण गाजत आहे. त्यामुळे तेथील राजकीय व धार्मिक दोन्ही वातावरण तापत आहे. अशात अकोला येथे उघडकीस आलेल्या प्रकारामुळे तणाव वाढणार नाही, याची काळजी पोलिस प्रशासन घेत आहे.