अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात मेल्यानंतर पुन्हा जिवंत झालेला प्रशांत मेसरे हा 25 वर्षीय तरुण अकोला होमगार्ड दलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. काही लोक याला दैवी चमत्कार समजत आहेत. तर काही लोक याला वैद्यकीय चूक समजत आहेत.
प्रशांतच्या अंगात येत असल्याची माहिती पुढे आली. तो एका मांत्रिकाच्या संपर्कात होता. प्रशांत गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असे त्याच्या कुटुंबियांनी गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला अंत्यविधीसाठी अकोला जिल्ह्यातील विवरा गावात आणले. काल रात्री सात वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यविधीची करण्याची तयारी सुरु झाली. प्रशांतला तिरडीवर बांधण्यात आले. गावकऱ्यांसह नातेवाईक त्याला घेऊन अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे रवाना झाले. त्याच्यात काही हालचाली गावकऱ्याना दिसल्या. यावेळी त्या अंत्ययात्रेत असलेल्या एका तांत्रिकाने त्याला गावातल्या मंदिरात घेण्यास सांगितले. प्रशांतला गावातील मंदिरात आणण्यात आले.
काही कालावधीनंतर प्रशांत आणि तांत्रिक दोघेही मंदिरातील खोलीतून बाहेर आले. यावेळी प्रशांत जिवंत होऊन चक्क लोकांशी बोलायला लागला होता. हे पाहून अनेकांना धक्का बसला. प्रशांतला भूतबाधा झाल्याचे या तांत्रिकाने सांगितले होते. बुलडाण्यातील सैलानी येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. चिखलीतल्या एका डॉक्टरकडेही प्रशांत उपचार घेत होता. या प्रकरणातील तांत्रिक फक्त 18 वर्षाचा असून तो मध्य प्रदेशमधील रहिवासी आहे. प्रशांतला बाधेतून बाहेर काढण्यासाठी त्याच्या मृत्यूचा बनाव करावा लागेल, असा कट रचला गेल्याची माहिती आहे. चान्नी पोलिसांनी याप्रकरणी प्रशांत, त्याचे वडील व तांत्रिकाला ताब्यात घेतले आहे.