Law & Order : अकोल्यात गेल्या काही महिन्यात कायदा व सुव्यवस्था पार बिघडली होती. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये अकोल्याच्या पोलिस अधीक्षकपदी आलेले जी. श्रीधर यांच्या अजब कार्यशैलीमुळे बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेने अकोल्यात जातीय दंगलीचे रूप धारण केले. त्याचे परिणाम कालांतराने तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनाही भोगावे लागले.
संदीप घुगे यांच्या बदलीनंतर आता बच्चन सिंह नवीन अधिकारी अकोल्याच्या पोलिस अधीक्षकपदी रुजू झाले आहेत. सिंह यांनी कार्यभार स्वीकारताच अकोल्यात नाकाबंदीचा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम स्तुत्य असला तरी केवळ सामान्यांना त्रास देऊन अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती सुधारेल असे नाही. (Akola Police Should Avoid Threating common man)
तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या कार्यकाळातील अनेक अधिकाऱ्यांचे गुन्हेगारांशी व माफीयांशी थेट संबंध होते. एखाद्या नागरिकाने गुन्ह्यांबाबत पोलिसांना माहिती दिली की, तक्रारकरत्याचे नाव आणि पत्ता पोलिसांकडूनच गुन्हेगार आणि माफियांना सांगितला जायचा. संदीप घुगे देखील या प्रकारावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत. त्यामुळेच बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या भर सभेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोरच आपल्याच घराशेजारी जुगार चालतो असे निदर्शनास आणून दिले. नितीन देशमुख यांच्यासह भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी तर संदीप घुगे यांची तक्रार थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
अशा अनेक तक्रारी संदीप घुगे यांना भोवल्या. अकोल्यात झालेल्या दंगलीबाबत राज्य गुप्तवार्ता विभागाने (SID) पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना फार पूर्वीच सतर्क केले होते. याशिवाय स्थानिक पातळीवरही काहींनी घुगे यांना दंगल घडण्याबाबत ‘ईनपुट’ दिले होते. कोण, कधी, कुठे, कशी दंगल घडवेल याची परिपूर्ण माहिती घुगे यांना देण्यात आली होती. तरीही घुगे यांनी दुर्लक्ष केल्याने अकोल्यात जातीय दंगल पेटली आणि एकाचा बळी गेला. त्यानंतरही अकोल्यात जातीय तणावाच्या अनेक घटना घडल्या. या घटनांसंदर्भात मिळालेल्या माहितीकडे घुगे यांचे दुर्लक्ष झाले.
आता नाव्याने आलेले बच्चन सिंह यांना ही सर्व आव्हाने पेलावी लागणार आहेत. बच्चन सिंह यांनी येताच स्वतः ‘एसी’ केबिन मध्ये बसण्याऐवजी ‘फिल्ड’वर उतरत कामाला सुरुवात केली आहे. अकोल्यातील गुन्हेगारी नियंत्रणासोबतच पूर्णपणे बिघडलेली वाहतूक व्यवस्था, ऑटो चालकांची मुजोरी, अवैध प्रवासी वाहतूक आणि पोलिस ठाण्यांमधून गुन्हेगारांशी केला जाणारा संपर्क यावर वचक बसवावा लागणार आहे. अकोल्यामध्ये आतापर्यंत आलेले अनेक पोलिस अधिकारी आणि जिल्हाधिकारी जनतेमध्ये लोकप्रिय झालेत. परंतु त्यानंतर आलेल्या काही अधिकाऱ्यांमुळे जनता आणि पोलिस प्रशासनामध्ये दुरावा निर्माण झाला. बच्चन सिंह यांना हा दुरावा दूर करण्यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत.
बच्चन सिंह यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता ते ज्या जिल्ह्यात गेले त्या जिल्ह्यामध्ये ‘किंग’ ठरले आहेत. त्यामुळे अकोला शहरातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्यापासून अनेक अपेक्षा आहेत. इतर जिल्ह्यांप्रमाणे बच्चन सिंह अकोल्यातही शिस्तप्रिय आणि कायद्याचे पालन करणारे ‘किंग’ ठरो, असेच सर्वांना वाटत आहे.
काय होता एसआयडीचा रिपोर्ट… ‘नवस्वराज’ने दिली होती Exclisive बातमी…