अकोला : खरपाणपट्ट्याच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आमदार नितीन देशमुख हे आंदोलन करीत आहे. परंतु त्यांच्यावर राजकीय सूड उगविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत गुन्हा नोंदविण्यात आल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेश मिश्रा यांनी केली. आमदार देशमुख यांच्यासह सव्वाशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘नवस्वराज’ने मिश्रा यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
मिश्रा म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने कोणतेही बेकायदेशीर आंदोलन करण्यात आलेले नाही. आमदार नितीन देशमुख हे लोकशाही मार्गाने पदयात्रा करणार आहेत. करीतही आहेत. त्यासंदर्भातील पत्र पोलिस विभागाला ५ एप्रिल रोजीच देण्यात आले होते. केवळ अकोला पोलिसांना हे पत्र देण्यात आले असे नाही. तर अमरावती परीक्षेत्र पोलिस, अमरावती महसूल विभाग, अकोल्याचे जिल्हाधिकारी, नागपूर पोलिस, उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय आदी सर्वांना पत्र देण्यात आले. पोलिसांना दिलेल्या पत्रात रितसर परवानगी मागण्यात आली होती.
पोलिसांनी परवानगीचे पत्रही दिले नाही आणि परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्रही दिले नाही, असा दावा राजेश मिश्रा यांनी केला. उलट प्रसार माध्यमांमध्ये नावे आल्यानंतर आम्हालाच धक्का बसला की जमावबंदी केव्हा लागू झाली, आम्ही ती केव्हा मोडली, आणि पोलिस गुन्हे दाखल करूनही मोकळे झालेत. आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात राजकीय सूडातून गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आल्याचेही राजेश मिश्रा यांनी सांगितले.
स्वस्थ बसणार नाही!
६९ गावांतील नागरिकांना खारपाणपट्ट्यातील दूषित पाण्याचा त्रास होत आहे. यासंदर्भात सुरू असलेले आंदोलन हे जनहिताचे आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही. संघर्ष पदयात्राही राजकीय उद्देश्याने प्रेरीत नाही. असे असतानाही आमदार देशमुख आणि आमच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे म्हणजे दडपशाही असल्याचे राजेश मिश्रा म्हणाले. गुन्हा दाखल झाला तरी आमदार देशमुख आणि आम्ही स्वस्थ बसणार नाही असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.