Akola | अकोला : लरातो वाणिज्य महाविद्यालयात एमसीएम विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुलसीदास मिरगे 30 डिसेंबरला सेवानिवृत्त झालेत. त्यानिमित्ताने त्यांच्या निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर. डी. सिकची होते. कार्यक्रमाची प्रस्तावना कॉलेज कौन्सिलच्या सचिव प्रा. डॉ. वंदना मिश्रा यांनी केली. प्रा. मिरगे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी सुचेता मिरगे यांचा देखील सत्कार करण्यात आला.(Akola LRT College Dr Mirge Retirement Ceremony)
डॉ. मिरगे यांनी सत्काराला उत्तर देताना महाविद्यालयातील कार्यकाळादरम्यान आलेल्या अनेक अनुभव तसेच आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य डॉ. सिकची यांनी डॉ. मिरगे यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवांवर प्रकाश टाकला. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देत सामाजिक कार्यांत मोठा वाटा उचलतील अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. महेश डाबरे, डॉ. कविता फाटे, अनिल पालवे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
डॉ. मिरगे यांच्या सेवाकार्याचे प्राध्यापक दीपिका बियाणी यांनी ‘पावर पॉइंट प्रेझेंटेशन’ केले. विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. प्राध्यापक डॉ. अनिल तिरकर यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी डॉ. मिरगे यांचे कुटुंब, महाविद्यालयाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.