अकोला : महावितरण कंपनीने बहुतांश वीज ग्राहकांचे मीटर घराबाहेर बसवले आहेत. ग्राहकांना मीटर वाचनानुसार देयक मिळावे, वीज चोरीवर आळा बसावा या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. मीटर प्लास्टिक बाॅक्स मध्ये असते, कालांतराने वातावरणाचा परिणाम बाॅक्सचे झाकणावर होतो, मीटरचे वाचन स्पष्ट दिसत नाही. त्याची प्रतिमा स्पष्ट दिसावी म्हणून मीटर वाचक समोरचे झाकण फोडतात. दणक्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीटर नादुरुस्त होऊ शकते.
मीटरला लावलेले कागदी सील खराब होतात. मीटरची गॅरंटी पाच वर्ष आहे. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ग्राहकाची असली, तरी चोवीस तास लक्ष देणे शक्य नाही. ते ग्राहकाच्या चुकीमुळे खराब झाले तर त्याने स्वखर्चाने बदलवून घेणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त अन्य कारणामुळे नादुरूस्त झाले तर कंपनीने विनामूल्य बदलवावे असा नियम आहे. मध्यंतरी कंपनीने फ्लॅश व रोलॅक्स कंपनीचे मीटर लावले. ते सदोष असल्याच निदर्शनास आल्यावर, लावण्यात येऊ नये असे मुख्य कार्यालयाचे पत्र आहे. अनेक ग्राहकांकडे अजुनही या कंपनीचे मीटर आहेत. ते बदलवण्यात आलेले नाहीत. मटीरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंट, मुंबईने १३ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून सात कंपन्यांचे मीटर ग्राहक बाहेरच्या वितरकाकडून खरेदी करू शकतो, असे त्यात म्हंटले आहे. त्याचा फायदा घेऊन मीटर बदलवण्यासाठी तसेच नवीन वीज पुरवठ्याची मागणी करणाऱ्यांना, ठराविक दुकानातून खरेदी करण्याचे सांगण्यात येते. त्याची किंमत रू. २५०० /- असून, ग्राहकाला बिलातून फक्त रू. ९००/- चे समायोजन देण्यात येते, रू.१६००/- चा भुर्दंड ग्राहकांवर पडतो. वारंवार होणाऱ्या वीज दर वाढीमुळे ग्राहक आधीच त्रासला आहे. बाहेरून मीटर खरेदी करण्यास सांगून, त्याचे आर्थिक शोषण करणे योग्य नाही. शहरातील मीटर वाचनाचे तंत्र बिघडले आहे, ग्राहकांना फाॅल्टीची दाखवून नंतर अवास्तव देयके देण्यात येत आहेत. जुने शहरात दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडीत होतो. अशा अनेक समस्या आहेत, यात सुधारणा होऊन ग्राहकांना दिलास द्यावा. या आशयाचे हेमंत जकाते संघटनमंत्री, दिनेश पांडे अध्यक्ष, मंजित देशमुख वीज ग्राहक संघ प्रमुख यांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोलातर्फे मुख्य अभियंता अकोला परिमंडळ, मुख्य अभियंता एमएमडी मुंबई, अधीक्षक अभियंता अकोला मंडळ तसेच कार्यकारी अभियंता शहर विभाग यांना देण्यात आले. सुनिल कळमकर कार्यकारी अभियंता शहर विभाग यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी समस्यांबाबत चर्चा केली. योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ग्राहकांना बाहेरून मीटर घेणे सक्तीचे नाही, हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सचिव मनोज अग्रवाल तसेच मार्गदर्शक मनोहर गंगाखेडकर यावेळी उपस्थिती होते, असे विजय केंदरकर व मिलिंद गायकवाड प्रसिद्ध प्रमुख यांनी कळवले आहे.