Home » Yavatmal : अजित पवारांची दादागिरी? पालकमंत्र्यांनाही कळले नाही 

Yavatmal : अजित पवारांची दादागिरी? पालकमंत्र्यांनाही कळले नाही 

by नवस्वराज
0 comment

Yavatmal | यवतमाळ : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गट व भाजपने अद्यापही अनेक शासकीय, अशासकीय समित्यांवर नेमणूक केलेली नाही. जिल्हा नियोजन समितीवर प्रारंभी शिवसेना एकनाथ शिंदे गट व भाजपच्या प्रत्येकी सहा कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचे ठरले होते. मात्र कोणाला संधी द्यावी, याबाबत दोन्ही पक्षांत अद्यापही एकमत झाले नाही.

मध्यंतरीच्या काळात राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार सहभागी झाले. त्यामुळे नियोजन समितीत प्रत्येक पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी चार जागा आल्या. परंतु शिवसेना, भाजपने समितीवर कोणाला पाठवायचे हे ठरवलेच नाही. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री पदाची सूत्रे अजित पवारांनी स्वीकारली. त्याचा फायदा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी करून घेतला. सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पालकमंत्र्यांना डावलून यवतमाळ जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांची नियुक्ती केली. ही निवड करताना शिवसेना आणि भाजपला विश्वासात न घेतल्याने सत्ताधारी पक्षांत समन्वय नसल्याचे सांगण्यात येत आहे. ( Ajit Pawar Directly Appointed DPC Members)

या नियुक्तीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील भापजच्या पाचही आमदारांना या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. नियोजन समितीसाठी शिवसेना, भाजपातील अनेकजण बाशिंग बांधून तयार असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजप, शिवसेनेला जोरदार झटका देत बाजी मारली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!