Bengaluru | बेंगलूरू : शिक्षकांना शिकवण्यासाठी सहाय्य करणारा पहिला शिक्षक रोबोट कर्नाटक राज्यातील बेंगलूरू येथील इंडस इंटरनॅशनल स्कूलच्या कृत्रिम बुद्धीमत्ता तज्ञ्ज चमूने (AI Team) निर्माण केला आहे. ( Bengluru Indus International School Artificial Intelligence Expert Team Has Built Up Robot Teacher)
सुमारे 5 फुट 7 इंच उंची असलेला शर्ट आणी स्कर्ट परीधान केलेला महिला वेशभूषेतील इगल २.० (Eagle 2.0) शिक्षक रोबोट वर्ग सातवी, आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास आणि भूगोल विषय शिकवण्यात शिक्षकाना सहाय्य करतो. आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना या विषयासंबंधी कुठल्याही क्लिष्ट प्रश्नासाठी मोठी पुस्तके चाळण्याची अथवा गुगलवर शोध घेण्याची आवश्यकता नाही. रोबोट शिक्षक क्षणात प्रश्नाचे अचूक उत्तर देतो.
इगल २.० या रोबोट शिक्षकाच्या निर्मितीला इंडस इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल अर्जुन रे यांनी प्रोत्साहन दिले. प्रोग्रामिंग कंटेंट आणि ग्राफिक्स तज्ञांची 17 लोकांची चमू यासाठी दोन वर्ष झटली असे चीफ डिझाईन ऑफिसर तसेच रोबोट प्रोजेक्टचे प्रमुख विघ्नेश राव यांनी सांगितले. तूर्तास मोजकेच शिक्षक रोबोट बनवले आहेत. 45 किलोग्राम वजनाचा एक रोबोट बनवण्यासाठी आठ लाखांचा खर्च येतो. त्यांना वेळोवेळी अद्ययावत करण्यात येते. शिक्षक रोबोट बनवण्याचे काम कुठल्याही मोठ्या कंपनीला देण्यात आले नव्हते, राव आणि त्यांच्या चमूने आवश्यक सामग्रीची जुळवाजुळव करून रोबोटची निर्मिती केली, हे विशेष. शिक्षक रोबोटमुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचाही उत्साह वाढला आहे.