अकोला : महाराष्ट्र शासनाने ८ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जनतेला रक्त पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी सुधारित दर निश्चित केले आहेत. राष्ट्रीय रक्त धोरणाची योग्य अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून राज्यातील शासकीय व अशासकीय रक्तपेढ्यांमार्फत रक्त व रक्तघटक पुरवण्यासाठीचे वाढीव सुधारीत दर निश्चित केले आहेत. शासकीय रक्तकेंद्रासाठी सुधारीत प्रक्रिया शुल्क. हे शुल्क प्रचंड वाढले आहे.
एक बॅग रक्तासाठी आता १ हजार १०० रुपये मोजावे लागणार आहे. पॅक रेड सेलसाठीही तितकीच रक्कम मोजावी लागणार आहे. फ्रेश फ्रोजन प्लाझ्मासाठी ३०० रुपये प्रति बॅग शुल्क द्यावे लागले. प्लेटलेटसाठी ३०० रुपये व ईतर रक्त घटकासाठी ( Cryoprecipitate) २०० रुपये मोजावे लागणार आहेत. अशासकीय रक्त केंद्रासाठी सुधारित प्रक्रिया शुल्क पुढील प्रमाणे असेल. रक्त बॅगसाठी १ हजार ५०० रुपये, रेड सेलसाठी तितकीच रक्कम, प्लाझ्मासाठी ४०० रुपये, प्लेटलेटसाठी ४०० रुपये व ईतर रक्त घटकांसाठी २५० रुपये प्रति बॅग मोजावे लागणार आहे.
अतिरिक्त चाचण्या व विशेष चाचण्यांचे शुल्कात बदल करण्यात आलेला नाही. प्लेटलेट अफेरेसीसचे चाचणी शुल्क अशासकीय रक्तकेंद्रासाठी पूर्वी प्रमाणेच ११ हजार तसेच शासकीय रक्त केंद्रासाठी ९ हजार कायम ठेवण्यात आले आहेत. शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना रक्त व रक्तघटक मोफत पुरविण्याची सवलत सुरू राहणार असली तरी खासगीतील रुग्णांच्या नातेवाईकांना दरवाढीचा फटका बसणार आहे. शासकीय रक्त केंद्रात रक्त बॅगचा कायम तुटवडा असतो. आवश्यक ग्रुपचे रक्त उपलब्ध असलेच याची खात्री नसल्याने रुग्णांना अशासकीय रक्त केंद्रातून जादा दराने घेण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जास्त पैसे मोजावे लागणारआहे. शासनाने रक्त प्रक्रिया शुल्कात केलेली वाढ ताबडतोब रद्द करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.