अकोला : उगवा येथील जगदंबा माता मंदिरात शिवभक्तांसाठी श्रावण मासातील प्रत्येक रविवारी आरोग्य सेवा, फराळ व चहापाण्याची व्यवस्था करण्याचा संकल्प श्री राजराजेश्वर शिवभक्त सेवा समिती व सत्यसाई सेवा समिती तर्फे करण्यात आला. त्यानुसार पहिल्या सोमवारी उशिरा रात्रीपर्यंत दोनशेवर शिवभक्तांवर औषधोपचार व मलमपट्टी करण्यात आली, दोघांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
दर सोमवारी निघणाऱ्या कावड व पालखी मधील शिवभक्तांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन समिती अध्यक्ष गोपाल नागपुरे, भाजपा नेता डॉ. अशोक ओळंबे, सत्यसाई सेवा समिती जिल्हाध्यक्ष किशोर रत्नपारखी यांनी केले. डॉ राजेंद्र वानखडे, डॉ. योगेश साहू, रवी देशमाने, निखिल नाळे, सुनिल वनारे, यज्ञेश नागपुरे, रवींद्र गाडे, अविनाश खूनेरे, रोहित इचे, गजानन गोलाईत यांनी सेवा दिली. यावेळी सेवा समितीचे सदस्य देखील उपस्थित होते.
शिवभक्तांनी गांधीग्राम येथील लाईट व्यवस्था, रात्री दहावाजे नंतर गाणे, वाद्य न वाजवण्याची सक्ती, पार्किंग व्यवस्था, रस्त्याची दुरावस्था, रस्त्याचे काम पूर्ण नसतांना टोल उभारण्याची घिसडघाई याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.जनप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने शिभक्तांच्या सोई सुविधा कडे लक्ष देण्याची आवश्यकता असून येणाऱ्या सोमवार पर्यंत समस्या दूर कराव्या अशी मागणी सहभागी कावड व पालखी मंडळांनी यावेळी केली. डॉ. अशोक ओळंबे, गोपाल नागपुरे, रवी देशमाने, डॉ योगेश साहू, डॉ राजेंद्र वानखडे यांनी शिवभक्तांच्या मागणीला दुजोरा दिला आहे.