मुंबई : माणूस कितीही शिकला चंद्र, मंगळावर गेला तरी अजूनही काही लोक व समाजाची मानसिकता बुरसटलेली असल्याचा प्रत्येय विरार येथील चिखलडोंगरी गावातील एका कुटुंबाला वाळीत टाकण्याच्या प्रकरणावरून येतो. विरारच्या चिखलडोंगरी गावात ‘मांगेला’ समाजाचे लोक राहतात. या गावात जात पंचायत अस्तित्वात असून समाजावर त्याचे वर्चस्व आहे.
मुरबाड तालुक्यातील सासणे या गावातील दत्त देवस्थान वारकरी ट्रस्ट आणि गावपंचायतीचा वाद असल्यामुळे चिखलडोंगरीच्या गावकर्यांना सासणे येथे जायला बंदी आहे. चिखलडोंगरीचे मंगला केवल वैती हे सासणे येथील नीलेश जोशी यांना आपला गुरू मानतात. त्यामुळे मंगला वैती आणि निलेश जोशी यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे आहे. दोघांचाही गावकऱ्यांशी वाद असल्यामुळे मंगला वैती यांच्याशी गावकऱ्यांनी संबंध ठेवू नये असे चिखलडोंगरीच्या जात पंचायतीचे म्हणणे आहे.
याप्रकरणी मंगला वैती यांनी मंगळवारी रात्री पोलीसात तक्रार दिली. अर्नाळा पोलीसांनी कुटुंबाला वाळीत टाकल्याप्रकरणी मांगेला समाजातील जात पंचायतीच्या १६ जणांवर व इतर कमिटी सदस्यांचे विरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गावातील वातावरण तणावपूर्ण असल्यामुळे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.