Khamgaon : जमीन मोजणीत अन्याय झाल्याचा आरोप करीत एका शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात घडली आहे. या धक्कादायक घटनेने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याने आकांत करीत न्याय देण्याची मागणी केली.
खामगाव तालुक्यातील आवार येथील शेतकरी ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे यांचे पिंपरी गवळी येथे शेत आहे. शेताची मोजणी 18 मार्च 2021 रोजी भूमि अभिलेख अधिकारी खराटे यांनी केली होती. मोजणी चुकीची झाल्याचा आरोप लांडे यांनी केला होता. मोजणीवर त्यांनी हरकत घेतली होती. हरकतीचा सातत्याने पाठपुरावाही केला. मात्र दखल घेण्यात आली नाही. अखेर कंटाळून लांडे यांनी सोमवारी (ता. 29) दुपारच्या सुमारास खामगाव येथील भूमि अभिलेख कार्यालयात अंगावर डिझेल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. नागरिकांनी सतर्कता दाखवत शेतकऱ्याला रोखले.