Major Accident : भंडारा शहरा जवळ असलेल्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डनंस फॅक्टरी) भीषण स्फोटाची घटना आज सकाळी 08.30 वाजता घडली. दुर्घटनेत एक कर्मचारी ठार झाला. स्फोट इतका भीषण होता की त्यात कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
सी एक्स विभागात हा स्फोट झाला असून, मृत कर्मचार्याचे नाव अविनाश मेश्राम असे आहे. सी एक्स हा केमिकलचा एक विभाग आहे. अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या पाळीत कामाला आले होते जी सकाळी 6 वाजता सुरू होते. काम सुरू केल्याच्या अडीच तासानंतर सदर घटना घडली. स्फोट होताच ऑर्डनंस फॅक्टरीमध्ये एकच धावपळ झाली.
स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यासाठी फॅक्टरीचे अग्नीशमन दल सरसावले आणि ताबडतोब आग आटोक्यात आणली. स्फोटाच्या घटनेमुळे कर्मचारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी भंडारा जवळील सनफ्लॅग कंपनीत स्फोटाची घटना घडली होती. त्यात तीन कर्मचार्यांना गंभीर दुखापत झाली होती. यावर्षी भंडारा जिल्ह्यात घडलेली स्फोटाची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे नागरीक देखील धास्तावले आहेत.