Mumbai | मुंबई : गर्व से कहो हम हिंदू है हा स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचा नारा होता. बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते. राम मंदिर निर्माण कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे. असा नेता पुन्हा होणे नाही, असे विचार हनुमान गढीचे महंत राजुदास महाराज यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्यावर मात्र राजुदास महाराजांनी कडाडून टीका केली.(Hanuman Gadhi Mahant Rajudas Maharaj Criticized Uddhav Thakeray)
राजुदास महाराज म्हणाले की, बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी धोरणाला उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिल्यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्याला क्लेश होत असतील. रामाच्या अस्तित्वावर ज्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला, रामाला काल्पनिक म्हटले, राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी ज्यांनी काळे कपडे घालत निषेध केला, त्या रामविद्रोहींसोबत आज उद्धव ठाकरे उभे आहेत. आज त्यांची अवस्था काय आहे, त्यांचा पक्ष फुटला या सगळ्या बाबींचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा. त्यांची वागणूक बघून वेदना होतात, असे वक्तव्य महंत राजुदास महाराज यांनी केले. त्यांच्या पक्षाचे घमेंडी प्रवक्ता जे बोलतात ते अत्यंत निषेधार्य आहे. जो राम का नही वो किसी काम का नही, हे महाराष्ट्राच्या लोकांना समजले आहे. राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी आहे. त्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय हा सर्वस्वी ट्रस्टचा आहे. परंतु जे रामद्रोही आहेत, त्यांना मुळीच बोलावू नये, असा सल्लाही महंत राजुदास महाराज यांनी दिला आहे.