Sakoli | साकोली : बारावीत शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय पोटच्या मुलीला जन्मदात्या आई-वडिलांनी पैशांसाठी विकत विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडले. हि घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलिस स्टेशनहद्दीत घडली आहे. पीडितेच्या काकूने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. (Mother & Father Sold Their Under Daughter For Money To Gangrape in Wadad Village of Bhandara)
साकोली तालुक्यातील वडद गावात ही घटना घडली आहे. पीडिता साकोली येथील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेते. वडद गावातून ती दररोज येणे-जाणे करीत होती. हा त्रास वाचविण्यासाठी ती साकोली येथील काकांकडे राहत शिक्षण घेत होती. कालांतराने पीडितेच्या वडिलांनी तिला गावात परत बोलावून घेतले. बऱ्याच दिवसांपासून पुतणीसोबत बोलणे न झाल्याने काकाने 14 डिसेंबरला तिला फोन करून विचारपूस केली. त्यावेळी तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. हे ऐकल्यानंतर धक्का बसलेल्या पीडितेच्या काकूने पुढाकार घेत साकोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पैशांसाठी पोटच्या मुलीला आई आणि वडिलांनीच ओळखीतील काही इसमांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. महिन्याभरात तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरित्या अत्याचार झालेत. कधी तिच्याच घरीच आई-वडिलांच्या समक्ष, तर कधी साकोलीत तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिला मारहाण करीत अत्याचार करण्यात आलेत. याप्रकरणाची तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली. यातील एक आरोपी फरार आहे. त्याचा पोलिस घेत असल्याचे भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले.