Ahemadnagar | अहमदनगर : महाराष्ट्रात एक गाव असे आहे जेथे दिवस फक्त 6 ते 7 तासांचा असतो, हे सांगितले तर विश्वास बसणार नाही. परंतु सह्यांद्रीच्या उंच डोंगररांगात अहमदनगरच्या अकोले तालुक्यात वसलेले फोफसंडी नावाचे गाव आहे. या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथे सूर्योदय दोन ते अडीच तास उशिरा होतो. सूर्यास्त देखील तितकेच तास आधी होतो. त्यामुळे दिवस फक्त सहा ते सात तासांचाच असतो. (Only 6 To 7 Hours Day At Fofsandi Village Of Akole Taluka District Ahemadnagar)
इंग्रजांची राजवट असतांना ‘फाॅफ’ (Fof) नावाचा अधिकारी रविवारी या निसर्गरम्य गावात विश्रांतीसाठी येत होता. त्यामुळे गावाचे नाव ‘फाॅफसंडे’ (Fofsunday) असे पडले, पुढे त्याचे अपभ्रंश होऊन ‘फोफसंडी’ (Fofsandi) झाले. या गावाची लोकसंख्या 1 हजार 200 असून 12 वाड्या आणि वळे, पिचड, कोंडार, भगत, तातले, गोरे, उंबरे, आवाडे, गवारी, मेमाणे, भांगरे, भद्रीके अशा 12 आडनावाचे लोक येथे राहतात.
गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. निसर्गरम्य गाव असूनही रस्ता, पाणी, वीज अशा सुविधा अजूनही प्रत्येकाला मिळालेल्या नाहीत. मांडवी नदीचा उगम याच फोफसंडी गावात होतो. तेथील एका गुहेत ‘मांडव्य’ ऋषीने तपश्चर्या केल्यामुळे नदीचे नाव मांडवी पडले. पावसाळ्यात येथे जोरदार पाऊस पडतो. येथील फोफसंडीचा धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे.