Akola | अकोला : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांचे 3 नोव्हेंबरला निधन झाले. सलग सहा वेळा आमदार शर्मा पश्चिम मतदारसंघातून निवडून आले. दांडगा जनसंपर्क आणि मजबूत पक्षबांधणी यामुळे त्यांची मतदार संघावर पकड होती. त्यामुळे पश्चिम मतदारसंघ म्हटला की, भाजपातर्फे गोवर्धन शर्मा असे समीकरण होते. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. 26 ऑक्टोबर 2024 रोजी या विधानसभेचा कालावधी संपेल. त्यामुळे निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने पोटनिवडणूक होणार की नाही असा संभ्रम होता. परंतु आता प्रशासनातर्फे संभाव्य पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी तथा उपसचिव म. स. पारकर यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहेत. त्यात अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पोटनिवडणुकीसाठी लागणारे साहित्य आदींचा आढावा घेण्याची सूचना केली आहे. पत्रात भारत निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. असे नमूद केले आहे. (Joint Chief Electrol Officer And State Deputy Secretary Has Written Letter To District Election Officer To Take Review Of Material Required For Probable By- Election Of Akola Assembly West Constituency)
पोटनिवडणुकी बाबत संभ्रम असताना प्रशासनाने संभाव्य निवडणुकीची तयारी सुरू केल्यामुळे सर्व पक्षातील इच्छुक तयारीला लागले आहेत. पोटनिवडणूक होवो अथवा सार्वत्रिक निवडणूक यात सर्व राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. कुठल्याही पक्षाला आता अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाची निवडणूक सोपी नाही, हे नक्की.