Home » चिंचोली गावात आमदार हरीश पिंपळे यांना लोकांनी घेरले; ठाकरे गटावर आरोप 

चिंचोली गावात आमदार हरीश पिंपळे यांना लोकांनी घेरले; ठाकरे गटावर आरोप 

by नवस्वराज
0 comment

अकोला : मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांना युवा कार्यकर्त्यांनी घेराव घालत रस्त्याचा कामाचा जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. तुम्हाला आमदार कशासाठी निवडून दिले अशा प्रश्नांचा भडिमार आमदार पिंपळे यांच्यावर करण्यात आला. आमदार समर्थकांनी मला शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेतील तरुण हा ठाकरे गटातील असल्याचा आरोप होत आहे.

मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे रविवारी रात्री आपल्या मतदारसंघातील बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी गडावर देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. चिंचोली रुद्रायणी येथे जाण्यासाठी असलेले रस्ते खराब झाले आहेत. रस्त्याच्या मागणीसाठी यापूर्वी गावकऱ्यांकडून निवेदन देण्यासह आंदोलन करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही कोणतीच दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आला.

आमदार आपल्या मतदारसंघातील रस्त्याचे काम का करीत नाही, म्हणून चिंचोली रुद्रायणी येथील युवा कार्यकर्त्यांनी आमदार पिंपळे यांना घेराव घातला आणि विकासकामे का करीत नाही, म्हणून जाब विचारला. यावेळी मतदार विरुद्ध आमदार असा सामना रंगला. आम्ही तुम्हाला आमदार म्हणून कशासाठी निवडून दिले? अशा प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. रुद्राक्ष राठोड यांनी रस्त्याच्या कामाबाबत जाब विचारला असता, जि. प. अकोला हे या कामासाठी एनओसी देत नसल्याने सदर रस्ता करता आला नाही अशा प्रकारचे उत्तर आमदारांनी दिले. यावेळी आमदार हरीश पिंपळे आणि या युवा कार्यकर्त्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आमदार समर्थकांनी आपल्याला धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याचा आरोप रुद्राक्ष राठोड यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी रुद्राक्ष राठोड यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात आमदार हरीश पिंपळे यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!