वर्धा : विदर्भात नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणावर अन्नदान, भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. दररोज विविध प्रकारचा नाश्ता भंडाऱ्यांमधुन दिला जातो. यानंतर मात्र ठिकठिकाणी कचरा साचतो. कचरा उचलण्यात येत नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरते. प्रसाद देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचे ताट, वाटीचा कचरा पर्यावरणास घातक ठरत असल्याचे पाहून येथील गुंज या महिलांच्या सेवाभावी व पर्यावरण प्रेमी संस्थेने आगळेवेगळे आवाहन केले आहे.
देवीचा प्रसाद घेण्यासाठी घरूनच स्टीलची प्लेट किंवा वाटी आणावी, असे हे आवाहन आहे. प्लॅस्टिकचा उपयोग टाळावा. ज्या मंडळात हे कसोशीने पाळले जाईल त्यास रोख पुरस्कार गुंज तर्फे देण्यात येणार आहे. यासाठी संस्थेने एक व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर नागरिक स्टीलचा वापर करीत असल्याचा व्हिडीओ मंडळांना पाठवावा लागणार आहे. संस्थेकडुन खात्री केल्यानंतर पर्यावरणपूरक नवरात्र साजरा करणाऱ्या मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहे.