Home » हिंदु जनजागृती समितीतर्फे मी सनातन धर्मरक्षक अभियानाला सुरुवात

हिंदु जनजागृती समितीतर्फे मी सनातन धर्मरक्षक अभियानाला सुरुवात

by नवस्वराज
0 comment

अकोला : हिंदूविरोधी शक्तींचे षडयंत्र समस्त हिंदू समाजाने ओळखावे असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस म्हणाले. हिंदू जनजागृती समिती तर्फे डिएव्ही काॅन्हेंटच्या सभागृहात आयोजित मी सनातन धर्मरक्षक या अभियानाअंतर्गत स्टॅलिन ते स्टॅलिन व्हाया दाभोळकर, या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

भारतात मिशनरी, धर्मनिरपेक्ष, साम्यवादी आणि जिहादी शक्ती यांची युती झाली असून सनातन धर्माला नष्ट करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. याचे विरोधात हिंदु धर्मप्रेमींनी व हिंदुत्वादी संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. दरवेळी सनातन धर्मियांनाच षडयंत्रात गोवले जाते. त्यांच्यावरच अत्याचार केले जातात. यासाठी आपण सर्वांनी ही षडयंत्रे ओळखून त्यांचा निषेधही करावा.

राजहंस पुढे म्हणाले की, निखिल वागळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर उदयनिधी स्टॅलीनच्या विचाराशी सहमत असल्याचे म्हटले असून सनातन तसेच सनातन संस्थेविषयी गरळ ओकली आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांनी सनातन संस्थेवर बेछुटपणे आरोप केले. परंतु सनातन संस्थेविषयी केलेल्या आरोपांचा कुठलाही पुरावा आपणाजवळ नसल्याची कबुली हमीद दाभोलकरांनी न्यायालयासमोर दिल्यानंतर, कुठे तोंड लपवावे अशी वागळेंची स्थिती झाली होती.

राजीव गांधी यांची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना क्षमा प्रदान करणारा द्रवीड मुन्नेत्र कळघम पक्ष आज काँग्रेस पक्षाच्या आघाडीत सामील झाला आहे. डाॅ. दाभोलकर यांच्या मृत्युनंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर मेमोरियल प्राइज या नावाने पुरस्कार प्रदान करण्यास प्रारंभ झाला. २०१५ साली हा पुरस्कार हमीद दाभोलकर यांचे हस्ते केरळमधील तिरुवनंतपुरम शहरात प्रदान करण्यात आला. याच शहरात आणि आसपासच्या परिसरात जोसेफ स्टॅलीनचे समर्थक असणाऱ्या साम्यवाद्यांनी कित्येक निष्पाप हिंदुत्ववाद्यांच्या अमानुष हत्या घडविल्याचे सर्वज्ञात आहे. साम्यवाद्यांकडुन हिंदुत्ववाद्यांच्या होणाऱ्या हत्यांमध्ये ज्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो, त्या राज्यात जाऊन पेरियार यांच्या विचारांवर चालणाऱ्या संघटनेला हमीद दाभोलकरांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणे आणि हमीद यांचे जीवलग असणाऱ्या निखील वागळे यांनी पेरियार समर्थक उदयनिधी स्टॅलीनच्या वंशविच्छेदाचे समर्थन करणे हा एका पूर्वरचित कटाचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अशा देशद्रोही व धर्मद्रोही दुर्जनांना जोपर्यंत तुरुंगात पाठवले जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही राजहंस यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदु जनजागृती समितीचे अकोला जिल्हा समन्वयक अमोल वानखेडे यांनी तर सूत्रसंचालन पल्लवी वानखेडे यांनी केले. शिवसेना जिल्हाध्यक्ष योगेश अग्रवाल, राष्ट्रजागृती मंचचे अध्यक्ष व उद्योजक संजय ठाकूर, ब्राह्मण महासंघाचे उदय महा, शहरातील अधिवक्ता व धर्मप्रेमी नागरिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!