अकोला : कापूस उत्पादक चळवळीचे प्रणेते डॉ. वा.रा. कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा समारोप व सहकार महामेळावा माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत १२ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती दि अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
अकोला क्रिकेट क्लब मैदानावर १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता होणाऱ्या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार शरद पवार राहणार असून दूरदृश्य प्रणालीद्वारे नितीन गडकरी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ. अनिल देशमुख, कृषिशास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमात डॉ.वा.रा. कोरपे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या स्मृतिगंधाचे प्रकाशनसुद्धा केले जाणार आहे.