अकोला : नामांकित कंपनीच्या नावाखाली अकोल्यातील एमआयडीसीत परिसरात बनावट उद्योग उभारून पाइप, पाण्याची टाकी बनविण्यात येत होते. पोलिसांनी छापा टाकत या उद्योगाचा भंडाफोड केला. ‘सुप्रीम’ या कंपनीच्या नावावर हा व्यवसाय सुरू होता.
मुंबईतील कंपनीच्या संचालकांनी या बनावट उद्योगाची माहिती अकोल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. सुप्रीम या कंपनीसारखेच दिसणारे पाइप, पाण्याच्या टाक्या येथे आढळल्या. पोलिसांनी चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीन प्रतिष्ठानांच्या संचालकांविरुद्ध या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुप्रीम इंडस्ट्रिज लिमिटेडचे अधिकृत प्रतिनिधी श्रीहर शिवशरण त्रिपाठी (रा. गाजियाबाद) यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंपनी प्लास्टिक पीव्हीसी पाइप व पाण्याच्या टाकीचे उत्पादन करते. अकोल्यातील एमआयडीसी क्रमांक तीनमध्ये असलेल्या हिना ट्रेडर्सचे मालक हितेश सुरेशकुमार वखारीया व संकेत वखारीया हे सुप्रिम इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीचे डुप्लिकेट पीव्हीसी पाइपची निर्मिती करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याने कंपनीची बदनामी व आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले.
एमआयडीसी पोलिसांनी हिना ट्रेडर्स येथे छापा घालून सुप्रीम कंपनीचे विविध प्रकारच्या बनावट पाइपचे १२ बंडल (एकूण ५४१ पाइप) जप्त केले आहेत. या बनावट पाइपची एकूण किंमत एक लाख ६२ हजार ३०० रुपये आहे. यासोबतच श्रीराम हार्डवेअर कुंभारी रोड शिवर येथील गौरव बुब, गोपाल बुब यांच्याकडेही पोलिसांनी छापा घातला. येथेही सुप्रीम कंपनीचे बनावट सीपीव्हीसी पाइप आढळून आले. त्याची किंमत ३९ हजार रुपये आहे. एमआयडीसी क्रमांक तीन मधील साईधाम प्लास्टिक फॅक्टरीचे राजकुमार लठोरिया यांच्याकडेही छापा घालून सुप्रीम कंपनीच्या बनावट ५०० व १००० लिटर पाण्याची क्षमता असलेल्या प्रत्येकी १४ अशा २८ पाण्याच्या टाकी आढळून आल्या आहेत. पोलिस निरीक्षक वैशाली मुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर वानखेडे, दयाराम राठोड, सुनिल टाकसाळे, राम काळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुळतकर यांनी ही कारवाई केली.