अकोला : कत्तलीसाठी गोवंश निर्दयीपणे बांधून ठेवल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून १२ लाखांचे २८ गोवंश जप्त केले आहे. या प्रकरणात दोन आराेपींना पोलिसांनी अटक केली.
पातूर येथील मुजावर पुरा येथील गोठानावर फकीरा याच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात गोवंश हे कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवले असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून पोलिसांनी गोठ्यात छापा कारवाई केली. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे बैल व गोऱ्हे दिसून आले. गोवंशाना चारा-पाण्याशिवाय निर्दयतेने बांधलेले होते. तसेच त्यांचे अंगावर ठिकठिकाणी जखमांचे निशाण सुद्धा होते. या ठिकाणी उपस्थित असलेल्या मोहम्मद असलम शेख हाशम (४०, रा. उर्दु शाळा नं. २ जवळ, मुजावरपुरा, पातूर) शेख वाजिद शेख इब्राहीम वय (३०, रा. चमन मस्जीदजवळ, मुजावरपुरा, पातूर) यांना ताब्यात घेण्याात आले.
गोवंशामध्ये २३ बैल व ५ गोऱ्हे हे कुणाच्या मालकीचे असल्याची विचारणा करण्यात आली असता मालकी हक्काबाबतची पावती अथवा कागदपत्रे सादर करू शकले नाही. गोवंश हे कत्तलीसाठी बांधले असल्याचे त्यांनी सांगितले. १२ लाखांचे एकूण २८ गोवंश जप्त करून त्यांना म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थानात दाखल करण्यात आले. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पातूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.