गडचिरोली : नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन युवकांना गोदावरी नदीपात्रात जलसमाधी मिळाल्याची घटना सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली चेकपासून काही अंतरावर असलेल्या नगराम नदी घाटावर रविवार (१३ ऑगस्ट) ला दुपारच्या सुमारास घडली. सुमन राजू मानसेट्टी (१५) रा. आसरअल्ली व हिमांशू मून (२२) रा. न्यू बालाजी नगर नागपूर अशी मृतकांची नावे आहेत.
हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही नातेवाहिकांसह सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता. दरम्यान, (१३ ऑगस्ट) रोजी सकाळी तो आसरअल्ली येथील सुमन मानसेट्टी नावाच्या मुलाला घेऊन लगतच असलेल्या तेलंगाना राज्यातील कालेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला निघाला.मात्र,ते दोघेजण कालेश्वर न जाता सिरोंचा पासून काही अंतरावर असलेल्या इतर गावात जाऊन सुमन मानसेटी याचे नातेवाईक असलेले कार्तिक पडाला, नलिन पडाला व रंजित पडाला यांना घेऊन एकूण पाच जण गोदावरी नदीवरील नगरम घाटाकडे गेले. तिथे पोहोचताच पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले.
पाच जण नदी पात्रात उतरले.सुमन मानसेट्टी व हिमांशू मून हे दोघे समोर होते त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.अती खोलात गेल्याने काही कळायचं अगोदरच ते दिसेनासे झाले.अन्य तिघेजण कसेबसे बाहेर पडले. मात्र,पाण्याच्या प्रवाहाने हिमांशू व सुमन दूर वाहत जावून त्यांचा मृत्यू झाला.विशेष म्हणजे सुमन मानसेट्टी हा इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असून नागपूर वरून आलेल्या मुलासोबत गेला अन् त्याचा घात झाला.इतर तिघेजण सुमन मानसेट्टी याचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.