अकोला : समाजातील निराधार, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल असलेल्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून शासना तर्फे विविध योजना राबवल्या जातात. अनेकजण अशा योजनांचा फायदा घेत आहेत. योजना सुरू करण्यामागे शासनाचा हेतू अतिशय चांगला आहे. योजनांचा फायदा घेण्यासाठी काही कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते, शासनाचे कार्यालयात खेटे घालावे लागतात. लालफितशाहीत खरोखर निराधार आणि योजनेचा फायदा मिळण्यास पात्र असलेल्यांची प्रकरणे थंड बस्त्यात पडली असल्यामुळे, अनेक लाभार्थी वंचित रहात आहेत. गब्बर असलेले अपात्र मात्र सर्व शासकीय योजनांचा लाभ बिनबोभाट लाटतात, हि शोकांतिका आहे. शासनाने सर्वेक्षण करून तसेच विशेष मोहीम राबवून खोट्या लाभार्थींना हुडकून काढावे, शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
शासनाच्या अनेक विभागात मनुष्यबळाची वानवा जाणवते आहे. जे निराधार शारिरीक, बौद्धिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम आहेत त्यांना आर्थिक लाभ देण्यात यावाच परंतु शासनातर्फे राबविण्यात येणार्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी क्षमतेनुसार शक्य आहे तोवर त्यांचा वापर करून घ्यावा. यामुळे आपण परावलंबी आहोत याभावनेमुळे त्यांच्यात निर्माण झालेला न्यूनगंड नष्ट होऊन, स्वाभिमान जागृत होईल. शासनाची कामे होतील, आणि पैश्याचा योग्य विनिमय होईल.