अकोला : महानगरातील वाहतुक तसेच पार्किंगच्या समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे. सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवर भरधाव, चुकीच्या मार्गावरून चालणारे, विनाकारण हाॅर्न वाजवत, फटाके फोडत, जोरजोरात आरडाओरडा करत जाणारे, ट्रॅफिक सिग्नलचे नियम न पाळणारे, सिग्नलवर डाव्या बाजूला वळू इच्छिणार्यांची कोंडी करणारे तसेच रस्त्यावर कुठेही वाहन उभे ठेवणार्यांमुळे, वाहतूक नियमांचे प्रामाणिकपणे पालन करणारे त्रस्त झाले आहेत. सर्व वर्दळीच्या चौकात ऑटोरिक्षा चालक सवारीच्या प्रतिक्षेत रस्ता अडवून उभे असतात, मागच्यापुढच्या वाहन चालकाची पर्वा न करता, एकदम कुठेही ब्रेक मारून थांबतात.
शहरातील प्रमुख मार्गांवर दोन्ही बाजूला पिवळे पट्टे आखलेले आहेत, नियमानुसार त्याच्या आत वाहन उभे करणे आवश्यक असते. परंतु या पट्टयात रस्त्यावर व्यवसाय करणारे हातगाडी लावतात. मोठ्या शहरांप्रमाणे येथे सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था नाही. अनेक रहिवासी तसेच व्यवसायिक संकुलात पार्किंगची सोयच नाही. नागरीकांना बांधकामाचे नियम शिकवणार्या महानगरपालिकेच्या व्यवसायिक संकुलात देखील नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावर उभी करण्यात येतात, अशात टोईंग पथकाचा फेरा झाल्यास वाहने उचलून नेली जातात.
वाहतूक नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणारे तसेच वाहन पार्किंग करण्याच्या जागेवर हातगाडी लावणार्या फेरीवाल्यांवर शहर पोलीस वाहतूक शाखा तसेच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने वेळोवेळी संयुक्तपणे कारवाई करावी.