अकोला : जिल्ह्यात सरासरी ४९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तेल्हारा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजा बरसत आहे. बुधवारी दिवसभर जिल्ह्यातील विविध भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस होता.
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या जलपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील विविध नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा भारतीय मौसम विभागाच्या नागपूरस्थित वेधशाळेने दिला आहे. पावसाचा जोर बघता विदर्भातील सर्व जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातही प्रशासनाच्या दृष्टीने हाय अलर्ट जारी करण्यात आला असून बचाव पथकांना तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर त्यात पोहण्यासाठी जाऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.