अकोला : पावसाळाला लागून आज पूर्ण ४० दिवस संपले असून, महान धरणात पाहिजे तेवढी वाढ होऊ शकली नाही. धरणाचे भरावश्यावर अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी आणि नदी काठावरील ६४ खेडी गावातील जनतेची वर्षभर तृष्णा तृप्ती होते. धरणात आजरोजी जलसाठा कमी प्रमाणात शिल्लक राहल्याने धरणातील पाण्याचा केवळ अकोला शहरालच पुरवठा करण्यात येत आहे.
गत वर्षी ता. १७ जुलै रोजी महान धरणात ३४३.११ मीटर, ३२.७३४ दलघन मीटर आणि ३७.९० टक्के एवढा जलसाठा उपलब्ध होता. यंदा १७ जुलै रोजी ३४१.६८ मीटर, २२.३७० दलघन मीटर आणि २५.९० टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे, गत वर्षीचे तुलनेत यंदा १२ टक्के जलसाठा महान धरणात कमी आहे. यंदा पावसाळ्या गत ४० दिवसात महान धरणाच्या पाणी पातळीत दोन वेळेच्या वाढीत केवळ २६ सेंटीमीटरपर्यंतच वाढ होऊ शकली. महान धरणाच्या पाणी पातळीत भरमसाठ वाढ होण्याकरिता काटा-कोंडाळा नदीचे महान धरणात लवकरात लवकर आगमन होणे आज रोजी खूप गरजेचे आहे.
मालेगाव परिसरातील जऊळका, अमानवाडी, मुसळवाडी, धानोरा, फेट्रा या भागात दमदार आणि मुसळधार पाऊस पडणे अति आवश्यक आहे. महान धरणाच्या पाठीमागील लहान-मोठे तलाव, धरणे भरल्याशिवाय काटा-कोंडाळा नदीचे महान धरणात आगमन होणार नाही. महान धरणाला एकूण दहा गेट असून, प्रत्येक गेटचा आकार १६ फूट उंच आणि ४० फूट लांबी आहे. सद्या महान धरणात पाणीसाठा कमी असल्याने धरणाचे पाणी आजरोजी मुख्य गेटपासून चार फूट खाली गेले आहे.