अकोला : अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर येण्यास अधिकारी तयार नाहीत. दहशत असावी तर अशी कि, अकोला महानगरपालिकेचे नाव घेताच कापरे भरावे, परिस्थिती अशी आहे कि, पचास – पचास कोस दूर गावसे जब कोई आयुक्त अकोला महानगरपालिकामे आनेके बारे मे सोचता है, तो मां कहती है मत जाना, क्योंकी जनप्रतिनिधी भगा देंगे. हे एका नावाजलेल्या चित्रपटातील संवादाचे विडंबन असले तरी, हेच येथील वास्तव आहे. यावरून एकूण गल्लीच्छ राजकारणाची कल्पना येते. बदलीवर येणारा अधिकारी शिस्तप्रिय आणि प्रमाणिक असल्यास तो येऊ नये यासाठी काहींचे प्रयत्न सुरू होतात, इतकेही करून आलाच तर फटाके लावले जातात.
केवळ अकोला महानगरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाच याबाबत काळ्या यादीत आहे. चांगल्या अधिकाऱ्यांचे वावडे असलेला अशी अकोल्याची सर्वत्र ख्याती पसरली आहे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असली तरी हे सर्व आता अकोलेकरांच्या अंगवळणी पडले आहे. दुसऱ्या शासकीय, निमशासकिय विभागातही चांगले प्रामाणिक अधिकारी नागरीकांना देखील चालत नसावेत.
अधिकारी हे शासकीय कर्मचारी असले तरी जनप्रतिनिधी प्रमाणे ते देखील लोकसेवकच आहेत. त्यांच्या कामाचा लेखाजोखा तपासण्याचा त्यांना लोकशाही मार्गाने जाब विचारण्याचा अधिकार नागरीकांना आहे. परंतु उदासीनता आणि मला काय करायचे आहे? या वृत्तीमुळे महानगर आणि जिल्हा मागासलेला आहे. विकास व्हावा या हेतूने सज्जन शक्तीने पुढे येणे आवश्यक आहे, त्यांचा वचक जनप्रतिनिधीं वर राहीला तरच, चांगले अधिकारी येथे येण्यास धजावतील. सज्जन शक्तीचा रेटा, वचक, पाठबळ आणि सहकार्य असले तरच महानगर आणि जिल्ह्याचा विकास होऊ शकतो, गरज आहे ती निर्भिडपणे पुढाकार घेण्याची.