अमरावती : राणा आणि ठाकरे हा वाद सर्वश्रुत आहे. सध्या उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ज्या हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत, ते गर्ल्स हायस्कूल चौकाच्या जवळच आहे. त्यामुळे राणांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही हनुमान चालिसा पठण करणारच, अशी भूमिका राणांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या तणावसदृष वातावरण आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल (ता. ९) अमरावतीमध्ये आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या हनुमान चालिसा पठणाचे पोस्टर्स फाडले. त्यानंतर राणांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले. त्यावरून अमरावतीमध्ये वातावरण चांगलेच तापले. काल सायंकाळी राणांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले. त्यानंतर बेकायदेशीरपणे माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप रवी राणा यांनी काल (ता. नऊ) केला होता. आज गर्ल्स हायस्कूल चौकात राणांचे कार्यकर्ते हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्या पृष्ठभूमीवर पोलिसांनी तेथे बंदोबस्त वाढवला आहे.
शिवसेनेच्या वतीने आज (ता. १०) येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी काल रात्रीच उद्धव ठाकरे अमरावती शहरात दाखल झाले. या सभेच्या निमित्ताने ठिकठिकाणी शिवसेनेचे पोस्टर, बॅनर तसेच झेंडे लागले आहेत. झेंडे लावत असतानाच गर्ल्स हायस्कूल चौकात ठाकरेंच्या शिवसैनिकांना राणा दांपत्याचे पोस्टर दिसले. त्यावरून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हे पोस्टर फाडून आपला रोष व्यक्त केला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमरावतीत येत असतानाच त्यांच्या विरोधात मुद्दामहून असे बॅनर लावण्यात आल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. त्यावरून काल तापलेले वातावरण अद्यापही गरमच आहे.