अकोला: महाबीजच्या सोयाबीन फुलेसंगम वाण बियाण्याची पेरणी केली. सोबत आंतरपीक तूर सुद्धा पेरले. तुरीचे पीक उगवले मात्र, सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याची तक्रार तेल्हारा तालुक्यातील कार्ला येथील काही शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
तेल्हारा तालुक्यातील ग्राम कार्ला येथील शेतकऱ्यांनी २०२३-२४ च्या खरीप हंगामाकरिता पेरणीसाठी महाबीजचे बियाणे फुलेसंगम विकत घेतले आणि २५ व २८ जून रोजी या बियाण्याची त्यांच्या शेतामध्ये ११ एक्कर क्षेत्रावर पेरणी केली. आंतरपीक म्हणून तुरीची पेरणी सुद्धा केली. मात्र, हे सोयाबीन बियाणे सदोष असल्यामुळे त्याची कसलीही उगवण झाली नाही व तुरीचे पूर्णपणे उगवण झालेले आहे. याबाबत महाबीज अकोला शाखा अकोट कार्यालयाला माहिती दिली असता सदर शेतामध्ये मोक्याची पाहणी महाबीजचे कृषीक्षेत्रक अधिकारी एस.पी. फिरके अकोट व कृषी सहाय्यक मोहड यांना सोबत घेऊन तपासणी केली असता संबंधित सोयाबीन बियाणे सदोष असल्याचे निदर्शनास आले व त्यांचा अहवाल त्यांनी दिला आहे. सहरहु बियाणे सदोष असल्यामुळे आर्थिक नुकसान झाले असून, पेरणी वेळ सुद्धा वाया गेल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी निवेदनात नमुद केले आहे. सदोष बियाण्याबाबतचे विकत घेतल्याचे बिल जोडले असून, सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी तेल्हारा तालुक्यातील ग्राम कार्लाचे शेतकरी पंकज बाजारे, दिपाली बाजारे, अतुल बाजारे, प्रकाश बाजारे, प्रदीप बाजारे यांनी तेल्हारा कृषी अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.