Home » चिंतन करावे.. भाजपा आणि मतदारांनीही…!

चिंतन करावे.. भाजपा आणि मतदारांनीही…!

by नवस्वराज
0 comment
  • हेमंत जकाते

मागील दोन वर्षांत अनेक राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. केंद्रात भाजपा व मित्रपक्षांचे सरकार विकासात्मक कामे करीत असले तरी केंद्र आणि राज्याचे प्रश्न, समस्या वेगवेगळ्या असतात. त्या डोळ्यासमोर ठेवत मतदार राज्यातील समस्या सोडवू शकणाऱ्या पक्षाला मतदान करतो. पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक येथील निवडणुकांमध्ये चित्र वेगळे असल्याचे दिसले. त्या राज्यातील विजयी झालेल्या पक्षांनी मोफत वीज, पाणी आदी देण्याचे तसेच विशिष्ट धर्मियांना आकृष्ट करण्यासाठी, काही हिंदू संघटनांवर बंदी आणण्याचे तसेच त्यांना विशेष धार्मिक सोयीसवलती देण्याचे आश्वासन दिले. म्हणून त्या राज्यातील मतदार त्या त्या पक्षाच्या पाठिशी उभा राहिला. ही बाब देशाची एकात्मता तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असली तरी हे उघड सत्य आहे.

भारतीय जनता पार्टी चुकली की फाजिल आत्मविश्वास नडला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील अनेक मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांचा अतिशय कमी मतांच्या फरकाने विजय झाला. याच फरकाने भाजपाचा पराजय झाला आहे. पार्टीचे कार्यकर्ता मतदारांशी संपर्क करण्यात कमी पडला. कार्यकर्त्यांनी मतदारांना गृहित धरले. निष्क्रिय उमेदवार तसेच कार्यकर्ता ‘मोदी है तो मुमकिन है..’च्या घोषणा देण्यात मग्न होते. ही व्यथा अनेक मतदारांनी व्यक्त केली. परंतु मतदानाबाबत उदासीन असणाऱ्यांनी विनाकारण दुःख व्यक्त करू नये. गठ्ठा मतदान करणाऱ्यांपासून बोध घ्यावा. त्यांच्या नावाने बोटे मोडत बसू नये.

आगामी वर्ष निवडणुकांचे आहे. आगामी वर्षात लोकसभा आणि अजुन काही राज्यातील निवडणूक होणार आहेत. मागील निवडणुकीतील व्युहरचना यशस्वी झाल्यामुळे विरोधी पक्षांचे मनोबल वाढले आहे. विशिष्ट धर्मीय मतदाराला ‘देशाचा विकास आणि सुरक्षा’ या मुद्यांपेक्षा वीज, पाणी आदी मोफत तसेच अतिरिक्त धार्मिक सोयीसवलतीच्या आश्वासनाने आकृष्ट करता येते. याचे गणित गठल्यामुळे अशी विचारधारा असणारे तथाकथित निधर्मी पक्ष एकत्र आले आहेत. आगामी निवडणुकीत देखील ते याच सूत्राचा वापर जास्त भेदकपणे करतील. भारतीय जनता पार्टी, मित्र पक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोदी, शहा, योगी यांच्या नावाचा जप न करता तसेच मतदारांना गृहित न धरता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तूर्तास भारतीय जनता पार्टीजवळ मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. मतदारांनी देखील, माझ्या एका मताने काय फरक पडतो हा विचार बाजूला ठेवून स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क पार पाडावा. अन्यथा भारतीय जनता पार्टीचा काँग्रेस पक्ष आणि मतदारांवर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!