नागपूर : येत्या चार महिन्यात आदिवासी विकास विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांनी नागपुरात दिली. डॉ. गावित यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील कार्यालयात ६२ रोजंदारी कर्मचाऱ्यांना आणि पाच अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलीत. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व जात पडताळणी कार्यालये, आश्रमशाळा, वसतीगृहांना बारमाही रस्त्यांनी जोडण्यासाठी २ हजार कोटींची कामे करण्यात येणार आहेत. विभागात रिक्त जागांची भरती आणि कार्यालये बारमाही रस्त्यांनी जोडल्यास जनतेला या विभागाच्या सेवा सक्षमपणे पुरविण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी डॉ. गावित यांनी व्यक्त केला. जनतेपर्यंत आदिवासी विकास विभागाच्या सेवा प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची साथ महत्वाची असते. यासाठी नागपूर विभागाने रोजंदारी आणि अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यासाठी गतीने काम केले.आदिवासी विभागाच्या राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये रिक्त, रोजंदारी व अनुकंपा तत्वावर जागा भरण्याची प्रक्रिया सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी नमुद केले. ‘ड’ यादीमध्ये नाव नसलेल्या आदिवासी कुंटुंबांनी घरांसाठी अर्ज करण्याचे आवाहन डॉ. गावित यांनी यावेळी केले.