नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा मंगळवार, २ मे २०२३ रोजी केली. त्यानंतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना तर अश्रू अनावर झाले आहेत. शरद पवार यांच्या राजीनाम्या संदर्भात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांची मनधरणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शदर पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे हिच सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे, असे देशमुख यांनी सांगितले. शरद पवारांव्यतिरिक्त इतर कोणाचेही नाव अध्यक्ष पदाकरता चर्चेत नाही. शरद पवार अध्यक्ष राहिल्यास पक्षाला त्याचा फायदा होईल. विरोधी पक्षाची एकमूठ करण्यात देखील शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे शरद पवार हेच अध्यक्षपदी कायम राहावे, अशी आपलीही ईच्छा आहे, असे अनिल देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले.
राजीनाम्याचा सूतोवाच केल्यानंतर शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी पवार हेच अध्यक्षपदी राहावे, बाकी सर्व निर्णय मान्य असल्याची भूमिका मांडली. यावर पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आपण घेतलेला निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे काम कसे चालणार, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले. कोणताही निर्णय घेत असताना आधी सहकाऱ्यांची चर्चा करावी लागते. पण आपल्याला खात्री होती की, सहकाऱ्यांनी कधीच हो म्हटले नसते, असेही पवार म्हणाले. सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घेतला नाही, ही चूक होती, अशी कबुली पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांसमोर दिली. सर्वांशी चर्चा करून एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, असे पवार यांनी आंदोलनकर्त्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.