Home » सुप्रिया अध्यक्ष झाल्यास आनंदच : आमदार ठाकूर

सुप्रिया अध्यक्ष झाल्यास आनंदच : आमदार ठाकूर

by नवस्वराज
0 comment

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळुन निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून दूर होण्याचा निश्चय जाहीर केल्याने पक्षातील घड्याळीचे काटे स्तब्ध झाले आहेत. अशात अनेकांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाला पसंती दिली आहे.

अजित पवार यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध असल्याने त्यांना महाराष्ट्राचीही धुरा मिळणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस, भाजपा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अद्याप शरद पवारांच्या भूमिकेवर कोणतीही उघड भूमिका घेतलेली नाही. अशात माजी महिला व बालविकास मंत्री आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची बाजू उचलून धरली आहे.

खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च पदी जाणार असतील तर आपल्याला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी एका व्हिडीओतून दिली आहे. अॅड. ठाकूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र काँग्रेसने याबाबत सावध भूमिका घेतली आहे. अॅड. ठाकूर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया हे त्यांचे व्यक्तीगत मत असल्याचा खुलासा काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाने केला आहे. अशात अजित पवारांचे नाव राज्यातील नेतृत्वासाठी पुढे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांची चिंता वाढली आहे.

महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तथा माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजितदादांवर निशाणा साधला आहे. अजित पवार घोटाळेबाज आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे चुकीचे ठरेल, असा दावा श्रीमती पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी मनधरणी करूनही निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. केवळ दोन दिवसांची मुदत मागून त्यांनी कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काही कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आता समितीची ५ मे रोजी बैठक होईल. या बैठकीत नव्या पक्षाध्यक्षांचा निर्णय होऊ शकतो.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!