नागपूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना उचलून नेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अकोल्यावरून पायी आलेल्या आमदार देशमुख यांनी जलसंघर्ष यात्रेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर धडक देण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यापूर्वीच देशमुख यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले.
नागपूर शहराच्या सीमेवर ही जलसंघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली. आमदार देशमुख यांना पोलिसांनी दोन दिवसांपासून समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र १० एप्रिल पासून सुरू झालेली जलसंघर्ष यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर जाईलच या निर्धारावर आमदार देशमुख ठाम होते. त्यामुळे पोलिसांना त्यांना ताब्यात घ्यावे लागले. १० एप्रिल रोजी अकोल्यातून यात्रेला प्रारंभ झाला होता. २१ एप्रिल रोजी आमदार देशमुख आणि त्यांचे सहकारी खारपण पट्ट्यातील पाणी समस्येला घेऊन उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. जवळपास पाचशेच्या वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आमदार नितीन देशमुख यांच्या संघर्ष यात्रेला नागपूरच्या सीमेवर धामना या गावात पोलिसांनी स्थानबद्द केले. यावेळी त्या परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिस आता देशमुखांना घेऊन अकोल्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत. पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दवाब आहे. मात्र, काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नसल्याचे देशमुख म्हणाले.