हैदराबाद : एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केले. तुरुंगाच्या भीतीने ते मातोश्रीवर येऊन रडलेही होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केलाय. हैद्राबादमधील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आदित्य ठाकरे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवार लवकरच भाजपमध्ये जातील असे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळीकीची चर्चा रंगलेली असतानाच आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे बंडखोरीवर आरोप- प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.
शिंदे हे लढणारे नेते : भुमरे
छत्रपती संभाजीनगर : स्वतः चे पाप झाकण्यासाठी आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत आहेत. एकनाथ शिंदे हे रडणारे नाही, तर लढणारे नेते आहेत, अशा शब्दांत कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. संदीपान भुमरे म्हणाले की, आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. मला सांगा २०१९ मधे आम्ही युती म्हणून लढलो. ज्यांच्यासोबत निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत सरकार बनवण्याची आमची इच्छा होती. एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. त्यांना आम्ही सगळे आमदार आणि खासदारांनी मुख्यमंत्री व्हायला तयार केले.