नागपूर : बिलासपूर ते नागपूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसमधुन फुकट प्रवास करणाऱ्या ६५ रेल्वे अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांपैकी काहींनी आपल्या परिवारासह वंदे भारत सेमी हायस्पीड एक्स्प्रेसमधुन विनामूल्य प्रवास केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील अनेक अधिकारी उच्च पदांवर कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांना कदाचित रेल्वेच्या नियमांबद्दल माहिती नसावे त्यामुळे त्यांना सुरुवातीला दंड करण्यात येणार आहे. परंतु वारंवार असा प्रकार आढळुन आल्यास अधिकाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागू शकते, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या नियमानुसार फुकट प्रवास करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते.
ज्या रेल्वे झोनमध्ये हे ६५ अधिकारी काम करता त्या झोनच्या पीसीसीएमनी त्या विभागांना पत्र पाठवून चौकशी व कारवाई करण्यास सांगितले आहे. हे सर्व अधिकारी वरिष्ठ प्रशासकीय ग्रेडच्या खालच्या रँकचे आहेत. बिलासपूर ते नागपूर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. ही रेल्वे बिलासपूर ते नागपूर हे अंतर साडेपाच तासांत पार करते. बिलासपूरनंतर रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया येथे थांबते.