नागपूर : आपण गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण झालीय. ही बाब आपल्या लक्षात येतेय. त्यामुळे आपल्याला गृहमंत्री पदावरून हटविण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहे. असे असले तरी आपण गृहमंत्रिपद सोडणार नाही असे चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना दिले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
आपण कुणालाही घाबरत नाही. कुणाचीही भीड बाळगत नाही. आपण चुकीचे काम करीत नाही त्यामुळे कसलीही भीती आपल्याला नाही. चुकीचे काम करणाऱ्यांना शासन झाल्याशिवाय आपण शांत राहणार नाही, असा ईशारा फडणवीस यांनी टीका करणाऱ्यांना दिला. जे लोक कायद्याने चालत नाही त्यांना आपल्यामुळे भीती आहे, असा सज्जड दम त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना दिला. पुरोगामी महाराष्ट्रात कुणी कुणालाही धमकावू शकणार नाही. त्यामुळे अशांना शासन करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.