अकोला : उद्धव ठाकरे यांचे सावरकर प्रेम म्हणजे एक नौटंकी आहे. काँग्रेस सोबत राहताना त्यांनी सावरकरांवर बोलू नये असा घणाघात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि आमदार डॉ. संजय कुटे यांनी केला. सावरकर गौरव यात्रेबाबत माहिती देताना ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान निमूटपणे सहन केला. सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला, अशी टीका दोन्ही नेत्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांच्या बाबतीत दाखवायला हवी होती. उद्धव ठाकरेंकडे धाडस असेल तर त्यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारावे आणि काँग्रेसबरोबरची आघाडी तोडून टाकावी, असे आव्हान त्यांना दिले. मात्र, हे आव्हान त्यांनी स्वीकारले नाही, असेही आमदार सावरकर, आमदार डॉ. कुटे यांनी सांगितले.